Sanjay Kenekar : मनोज जरांगे शरद पवारांचा ‘सुसाईड बॉम्ब’, भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

•आझाद मैदानात आंदोलन सुरू असतानाच संजय केनेकरांचे स्फोटक वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू असतानाच, भाजपने त्यांच्यावर थेट राजकीय हल्ला चढवला आहे. भाजप आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगे यांना “शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब” असे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे मराठा आंदोलन आणि राजकारण या दोन्हीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे, जरांगे पाटील यांनी ‘आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही’ अशी भूमिका घेतल्याने सरकारवर दबाव वाढला आहे, तर दुसरीकडे, या राजकीय वक्तव्यांमुळे आंदोलनाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय केनेकर नेमके काय म्हणाले?
संजय केनेकर यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. “शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जाते. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषामुळे शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे,” असे ते म्हणाले. केनेकर पुढे म्हणाले की, “शरद पवार हे समाजाचे नुकसान करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल. त्यामुळे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे यांच्यासारखे सुसाईड बॉम्ब वापरतात हे दुर्दैव आहे.”
केनेकर यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारकडून वंशावळ समितीला मुदतवाढ
दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर गठीत केलेल्या वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत असल्याचे दिसून येत आहे.


