Mumbai News : सरकारच्या मंत्र्यांचे बेजबाबदार वर्तन: ठाकरे गटाची राज्यपालांकडे राजीनाम्याची मागणी!

•’हनी ट्रॅप’ ते डान्सबार प्रकरण; सुषमा अंधारेंनी जाहीर केली वादग्रस्त मंत्र्यांची यादी
मुंबई :- सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांकडून सुरू असलेल्या “अत्यंत बेजबाबदार वर्तनामुळे” विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. अशा मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने राज्यपालांकडे केली. राजभवन येथे राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वादग्रस्त मंत्र्यांची यादीच जाहीर केली.
सुषमा अंधारे यांनी विविध गंभीर आरोपांचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, “हनी ट्रॅपशी संबंधित असणाऱ्या लोकांची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणात प्रफुल्ल लोढाची अटक झाली असली तरी, त्याच्याकडून अजून अनेक माहिती येणे बाकी आहे. त्याच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा विचार व्हावा.”
त्यांनी पुढे म्हटले, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार सुरू आहे आणि या डान्सबारवर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडली आहे. ज्याच्या आईच्या नावाने असा डान्सबार आहे, तो माणूस गृहराज्यमंत्री पदावर कसा राहू शकेल? तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी डान्सबार बंद केले होते, आणि हे नवे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावे डान्सबार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.”
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर आणि विधिमंडळात रमी खेळण्यासारख्या कृतींवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच, “हॉटेल व्हिट्स आणि कोट्यवधी रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ तसेच सातत्याने उर्मटपणाची वक्तव्ये करणारे मंत्री संजय शिरसाट यांचे पायउतार होणे गरजेचे आहे,” असेही अंधारे म्हणाल्या. अनिल परब यांनी राज्यपाल यांना योगेश कदम, संजय शिरसाट यांच्याबाबतचे अनेक कागदपत्रे, पुरावे तसेच हनी ट्रॅपशी संबंधित काही पुरावे सादर केल्याची माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली.
सुषमा अंधारे यांनी जाहीर केलेल्या राजीनाम्याच्या मागणीत खालील मंत्र्यांचा समावेश आहे:
1.योगेश कदम
2.गिरीश महाजन
3.संजय शिरसाट
4.माणिकराव कोकाटे
5.नितेश राणे
या मंत्र्यांवर विविध आरोप असून, संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधिमंडळातील गँगवॉरमुळे विधिमंडळाची अप्रतिष्ठा होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला. तसेच खासदार संदिपान भुमरे यांचाही राजीनामा मागितल्याचे पाहायला मिळत आहे.अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंवा मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलावे, अशी मागणी ठाकरे गटाने राज्यपालांकडे केली.


