
Sanjay Raut On Bacchu Kadu : “सातबारा कोरा करा, ही मागणी मूळची उद्धव ठाकरेंची”; नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आणि रस्ते विस्तारीकरणावरही गंभीर आरोप
मुंबई :- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या नागपूर शहरात आमदार बच्चू कडू Bacchu Kadu यांनी तोंडाला पट्टी बांधून आंदोलन सुरू केले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी यावरून राज्य सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोणताही नेता किंवा शेतकरी आंदोलनासाठी उभा राहिल्यास त्याला ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
बच्चू कडू आणि ‘अर्बन नक्षलवादी’चा मुद्दा
बच्चू कडू यांच्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या राज्यात कोणीही आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, तर सगळ्यांना ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवायचं, यात माओवादी घुसलेत असं घोषित करून टाकायचं, अशी नवी पद्धत सुरू झाली आहे.”
राऊतांचा सवाल: “आता बच्चू कडू एक आंदोलन करतायत. कालपर्यंत ते तुमच्यासोबत होते, गळ्यात गळे घालून फिरत होते. पण आता बच्चू कडू यांच्यासोबत जे सहकारी या आंदोलनात सहभागी झालेत, ते नक्षलवादी झालेत का?”
मूळ मागणी: “सातबारा कोरा करा, नाहीतर चालते व्हा, ही मागणी मूळची उद्धव ठाकरे यांची आहे. त्या मागणीने पुन्हा जोर धरला असला तरी आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं कितपत योग्य आहे?”
भ्रष्टाचारावर टीका: “आंदोलन केलं की, अर्बन नक्षलवादी ठरवायचं. मग, भ्रष्टाचाऱ्यांना ‘अर्बन नक्षलवादी’ का ठरवत नाहीत? तुमच्या मंत्रिमंडळात बसलेत त्यांना ‘अर्बन नक्षसी’ का ठरवत नाही?” असा संतप्त सवाल राऊत यांनी केला.
नाशिक कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराचा आरोप
संजय राऊत यांनी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा थेट आरोप केला. “नाशिक त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे, तिथे पावलापावलावर भ्रष्टाचार होत आहे. साधारण 15 ते 20 हजार कोटींचे बजेट गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आणि गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या छोट्या-मोठ्या ठेकेदारांना मेहेरबानी खात्यात काम द्यायची, हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं काम सुरू आहे,” असे राऊत म्हणाले.
नाशिक रस्ते विस्तारीकरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त
नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावरही त्यांनी भाष्य केले. “रोड वायडनिंगच्या नावाखाली नाशिक-त्र्यंबक रस्त्याचं विस्तारीकरण सुरु आहे. त्याची गरज नाहीय. नाशिक महानगर विकास प्राधिकरण दोन्ही बाजूंची जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरावर, व्यवसायावर बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त आणि बेरोजगार करत आहे. शेतातून रस्ते काढण्याची काय गरज आहे?” असा सवाल त्यांनी केला. या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, मुख्यमंत्री मात्र ‘सर्वकाही आलबेल आहे’ असे सांगत आहेत. यामुळे राज्यात कमालीची अस्थिरता असल्याचा दावा राऊत यांनी केला.


