शिराढोण येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न
कळंब (प्रतिनिधी) दि. ११/०३/२०२४ रोजी श्री.लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था हासेगाव व ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण यांच्यावतीने साई मंगल कार्यालय शिराढोण येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोण ग्रामपंचायत च्या सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे या होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा अध्यक्ष लेडीज क्लब धाराशिव अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे, डॉ. सरोजिनी राऊत अध्यक्षा श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था हासेगाव,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी प्रवीण वराडे पाटील , ज्योती महाजन, प्रगती पाटील, नंदाताई पणगुडे ( भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष), मनीषा केंद्रे, सुतार ताई, हसेगाव शिराढोनच्या सरपंच प्रणालीताई गवळी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण भागातून आलेल्या विविध महिलांमधून ड्रॉ पद्धतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमांमध्ये या पैठणीच्या जवळा खुर्द येथील गृहिणी अर्चना दत्ता लोमटे मानकरी ठरल्या. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना मानाची पैठणी देण्यात आली. शंभर स्त्रियांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी महिलांनी विविध विषयांवर गीत गायन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनी राऊत म्हणाल्या की ग्रामीण भागातील स्त्रियांनी उद्योजकीय कौशल्य आत्मसात करून उद्योग उभारावेत. त्यांच्या उत्पादित वस्तूंना निश्चितच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच भविष्यकाळात बचत गटांचे एक मंत्रालय स्तरावर विभाग अर्चनाताईंच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्याचा प्रयत्न करू. व त्याविभागा मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करू. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अर्चनाताई पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्रियांनी आर्थिक साक्षरता अंगीकारायला हवी. स्त्रिया ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. तसेच याप्रसंगी त्यांनी शासनाच्या विविध योजना संदर्भात माहिती सांगितली. शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यावेळी नायगाव, पाडोळी, शिराढोण, हासेगाव, सौंदाना आंबा, पळसप, बोरवंटी, नागुलगाव, जवळा खुर्द, शिराढोण तंडा, आदी ग्रामीण भागातील आठशे महिलांची उपस्थिती होती. तसेच यावेळी नमो चषक भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या प्रथम क्रमांक प्राप्त पळसप येथील संघास एकतीस हजार व नमो चषक, शिराढोण येथील क्रिकेट संघास एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक व चषक, डिकसळ येथील क्रिकेट संघास तृतीय क्रमांकाचे 11 हजाराचे पारितोषिक व चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच परिसरातील कर्तृत्ववान उद्योजक महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित 800 महिलांना दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणादादा प्रतिष्ठानचे किरण पाटील ,व खवले सर यांनी केले आभार प्रदर्शन सुरेश महाजन यांनी मानले. जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतल्याबद्दल श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरोजिनी राऊत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.