Pune Crime : कल्याणीनगरमधील ‘पिपल्स अॅन्ड को’ रेस्टॉरंट मालकासह बाउन्सरवर गुन्हा दाखल
Pune Crime : मित्राला भांडणातून सोडवण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला आरोपींची शिवीगाळ करत काठी, बेल्ट आणि दगडाने बेदम मारहाण
Pune Crime :पुणे: कल्याणीनगर परिसरातील ‘पिपल्स अॅन्ड को’ रेस्टॉरंटच्या मालकासह बाउन्सरवर एका तरुणाला बेमद मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मित्राला भांडणातून सोडवण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला रेस्टॉरंट मालकासह बाउन्सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करत काठी, बेल्ट आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/Pune Crime
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथील ‘पिपल्स अॅन्ड को’ रेस्टॉरंटच्या समोर आणि मागील गेटजवळ घडली. फिर्यादी सुमित उर्फ स्मित नवनाथ मापारी (वय २३ वर्ष, रा. विश्रांतवाडी) हे आपल्या मित्रांसोबत परिसरात आले होते.
त्यावेळी फिर्यादी यांना काही आरोपी मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून सुमित मित्राच्या मदतीसाठी धावून गेले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी सुमित यांना जाब विचारत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी फिर्यादीला हाता-पायाने, लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठीने, बेल्टने तसेच जमिनीवर पडलेल्या दगडांनी जबर मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पिपल्स अॅन्ड को रेस्टॉरंट मालक शरद मांडगे, २ इसम (वय सुमारे ३५ ते ४० वर्षे) आणि बाउन्सर यांच्यावर भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BHSS) ५(३) नुसार कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे.
कल्याणीनगरसारख्या हाय-प्रोफाईल भागात रेस्टॉरंट मालक आणि बाउन्सरकडून अशा प्रकारे नागरिकांवर हिंसक हल्ला झाल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खिल्लारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सानप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार वणवे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे. कल्याणीनगरमधील पब आणि रेस्टॉरंट बाउन्सरच्या दादागिरीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.



