Virar Crime News : 24 वर्षांपासून फरार… अखेर गजाआड! — ‘त्या’ खुनाचा पडदा फाटला

विरारमध्ये 2001 साली भरदिवसा खून – मृत्यूच्या घटनेने हादरला होता परिसर
विरार :- 24 वर्षांपूर्वी रिक्षा भाड्याच्या वादातून खून करून फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला! गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्या सतत पाच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ही थरारक केस उलगडली आहे.
14 ऑक्टोबर 2001 रोजी, विरार पश्चिममधील डॉ. कोळी यांच्या दवाखान्यासमोर मोहरम अली मोहंमद ईब्राहीम अली (वय 56, रा. अर्नाळा) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने पोटात वार करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
विरारमधील रक्तरंजित प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या धाडसी तपासाला मोठा यश
त्यावेळी आरोपी हारून अली मुस्तकिम अली सय्यद (मूळ रा. कन्नोज, उत्तरप्रदेश) फरार झाला होता. पोलीसांनी त्याच्याविरोधात सीआरपीसी 299 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास पुन्हा सुरु केला. मृताच्या नातेवाईकांशी संवाद, साक्षीदारांची चौकशी, गुप्त बातमीदारांची मदत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अखेर हारून अलीचं ठिकाण शोधण्यात आलं.तलासरी येथे दबा धरून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांसमोर कबुलीजबाब देताना आरोपीने सांगितले की, रिक्षा भाड्याच्या कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने मोहरम अली यांच्यावर चाकूने वार केला.या कामगिरीबद्दल गुन्हे शाखा कक्ष-3 चे अधिकारी आणि अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या खुनाच्या प्रकरणाला अखेर न्याय मिळाला आहे.
ही कारवाई मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 अतिरिक्त कार्यभार (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलवर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसागर सोनवणे, प्रविण वानखेडे सर्व नेमणुक गुन्हे शाख्या कक्ष-3 व पोलीस निरीक्षकदिलीप तिवारी, नेमणूक एस.टी.एफ. लखनऊ उत्तरप्रदेश यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.



