
Vikhroli Latest Breaking News : टागोर नगरमधील धक्कादायक घटना; कपड्याचे गाठोडे वायरला अडकले आणि खेळणाऱ्या चिमुरडीवर काळाचा घाला
मुंबई l मुंबईच्या विक्रोळी परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावर विरजण घालणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. उत्सवासाठी लावलेला जड ध्वनिक्षेपक (Loudspeaker) अंगावर पडल्याने एंजल सोनकर या 3 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत विक्रोळी पोलिसांनी स्थानिक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
विक्रोळीच्या टागोर नगर, आंबेडकर नगर परिसरात सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एका सांस्कृतिक मंडळाने ध्वनिक्षेपक लावले होते. याच वेळी परिसरातून जुने कपडे गोळा करणारा एक इसम डोक्यावर कपड्यांचे मोठे गाठोडे घेऊन जात होता. गल्लीतून जाताना त्याच्या डोक्यावरील हे गाठोडे ध्वनिक्षेपकाच्या लोबंणाऱ्या वायरमध्ये अडकले. गाठोड्याचा हिसका बसताच वर बांधलेले दोन्ही ध्वनिक्षेपक वेगाने खाली कोसळले.
खेळता खेळता संपली जीवनयात्रा
दुर्दैवाने, त्याच वेळी चिमुरडी एंजल तिथे खेळत होती. खाली पडणाऱ्या दोन ध्वनिक्षेपकांपैकी एक थेट एंजलच्या अंगावर पडला. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. आसपास उभ्या असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करत धाव घेतली आणि तातडीने तिला बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांची कारवाई आणि सीसीटीव्ही फुटेज
ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे विक्रोळी पोलिसांनी संबंधित मंडळाने ध्वनिक्षेपक लावताना सुरक्षेची काळजी न घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे. पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


