मुंबई/पुणे, दि. ८ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Victims of politics
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय हालचालीतून गुन्हे दाखल होत असल्याने सनदी अधिकारी वर्ग मोठ्या चिंतेत अडकला आहे. हल्लीच्या काही घटनांमध्ये सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त ते थेट से.नि. महासंचालकांपर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. विशिष्ठ राजकीय हेतूने हे गुन्हे दाखल झाल्याचा सूर प्रशासनातून ऐकू येत आहे. Victims of Politics
राजकीय बाहुपाशात अडकलेला सनदी अधिकारी वर्ग आता मोकळ्याने श्वास देखील घेऊ शकत नाही. कोणत्याही राजकीय घटनेचा तांत्रिक, परिस्थितीजन्य, वस्तुनिष्ठ तपास करताना आता अधिकाऱ्यांना शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. राजकीय नेत्तृत्वाकडून सनदी अधिकारी हातात आला तर ठीक, नाहीतर मागील घटनांमध्ये ‘सापडलाच’ असा थेट संदेशच देण्यात आला आहे. या गोष्टी सुशासनाला बाधक आहेत.
सनदी अधीकारी म्हणून काम करताना प्रत्येक गोष्ट अधिनस्थ अधिकारी व त्यांच्याकडून आलेल्या अभिप्रायावर करणे क्रम प्राप्त असते. असे असताना देखील काही ठिकाणी राजकीय मर्जी सांभाळण्यासाठी ‘आऊट ऑफ लाईन’ काम केले जाते. आणि याच कामाचे भांडवल नंतर राजकीय व्यक्तींकडून होते, हि सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील या गोष्टी आता विसरता काम नये.
सत्तास्थानी कोणताही पक्ष असला तरी प्रशासनाचा रथ हा सनदी अधिकाऱ्यांकडून चालविला जातो. ज्याप्रमाणे लोकशाहीचे १) विधिमंडळ, २) न्यायपालिका, ३) प्रशासन आणि ४) प्रसारमाध्यमे हे चार स्तंभ आहेत त्याच प्रमाणे सरकार चालविताना राजकीय नेत्तृव व प्रशासन यांचा योग्य ताळमेळ गरजेचं. असो.
महाराष्ट्रातिल राजकारणात यापूर्वी कधीच अधिकाऱ्यांना ‘डोक्यात’ ठेवून ‘गेम’ करण्यात येत नव्हता परंतु आता नीतिमत्ताच संपुष्ठात आल्याने कायद्यानेच ‘गेम’ होताना दिसत आहेत. निःपक्ष काम करणे आता जिकरीचे झाले आहे. सत्तेच्या पटलावर कोण कधी राजा होईल याचा भरोसा नाही अशात अधिकारी म्हणून काम करणे आता अवघड झाले आहे.
राजकीय गणिते आलटून पालटून सत्तांतर घडविताना कायद्याची होणारी पायमल्ली ‘मतदार’ बघत असतो आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. (क्रमश:)