Vasai Crime News : वसईमध्ये 50 लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त; तीन आरोपींना अटक

•गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे ‘मेफेड्रॉन’ची तस्करी उघडकीस,तिघेही 22 वर्षांचे तरुण; तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
वसई :- अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्धच्या मोहिमेत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-2, वसईच्या पथकाने सापळा रचून 50 लाख रुपये किमतीचा 250 ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रॉन) अंमलीपदार्थ जप्त केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार जगदीश गोवारी आणि सचिन पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, 13 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क मैदानात तीन तरुण अंमलीपदार्थ विक्रीसाठी येणार आहेत.
या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि रात्रीच्या सुमारास तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 250 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमलीपदार्थ मिळून आला. त्याची बाजारपेठेतील किंमत 50 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या आरोपींची नावे
शहबाज हमिद शेख (वय 22), रा. नालासोपारा पूर्व
योगेश राजू राठोड (वय 22), रा. बांद्रा पश्चिम
जाफर आसिफ शेख (वय 22), रा. बांद्रा पूर्व
तिन्ही आरोपी 22 वर्षांचे तरुण असून, त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट (गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत.


