Ulhasnagar Tadipar News : तडीपार आरोपीला अटक, मनाई आदेश भंग
•उल्हासनगर पोलिसांची कारवाई ; तडीपार आरोपीला दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून केले होते हद्दपार
उल्हासनगर :- ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारण्यापासून शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पावले उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी असलेल्या अनेक आरोपींना शहराच्या बाहेर तडीपार करण्यात आलेले आहे. तडीपारीची आदेश असतानाही काही आरोपी सर्रास शहरांमध्ये वावरत असताना गेल्या काही दिवसांपासून घटना वाढत आहे. असे आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आलेले आहे. उल्हासनगर मध्ये एका आरोपीला दोन वर्षाकरिता शहरातून तडीपार केले होते. परंतु कालावधी पूर्ण होताच मनाई आदेश भंग करत शहरांमध्ये वावर करत होता. पोलिसांनी या आरोपीला मनाई आदेश भंग करण्याप्रकरणी अटक केली आहे.
तडीपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आरोपी अजय बन्सी पवार (26 वर्ष), या आरोपीला पोलीस उप आयुक्त परिमंडळ-04 वागळे इस्टेट यांनी 17 मे 2023 रोजी ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले होते. आरोपी अजय याने दिनांक 6 जून 2024 रोजी ठाणे शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 त्यांची कोणतीही परवानगी न घेता मनाई आदेश भंग करत उल्हासनगर मध्ये वावरत होता. उल्हासनगर पोलीस ठाणे मिळालेल्या माहितीवरून आरोपीला उल्हासनगर एक या परिसरातून अटक केली आहे. आरोपी विरुद्ध पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजय पवार याला अटक करून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे आणि या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव हे करत आहे.