Kandivali Crime News : कांदिवलीतून तरुणाचे अपहरण करून 1 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत

•छेडछाडीच्या आरोपावरून तरुणाचे अपहरण, मारहाण; समता नगर पोलिसांची यशस्वी कारवाई
मुंबई :- कांदिवली येथील 27 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे अपहृत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपींनी तरुणाला डांबून ठेवून त्याला मारहाण केल्याचेही उघड झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
कांदिवली पूर्व येथील पोयसर परिसरात राहणाऱ्या या 27 वर्षीय तरुणाचे शुक्रवारी बिहार टेकडी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी या तरुणाने एका मुलीची छेड काढल्याचा आरोप करत त्याचे अपहरण केल्याचे सांगितले. या घटनेनंतर आरोपींनी तरुणाच्या पत्नीला फोन करून “तुमच्या पतीने एका मुलीची छेड काढली आहे. त्याचा मृतदेह पाहायचा नसेल, तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल,” अशी धमकी दिली. आरोपींनी महिलेसोबत गैरवर्तन करत तिला शिवीगाळही केली.
या प्रकाराने घाबरलेल्या पत्नीने तात्काळ समता नगर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आणि एक पथक पोयसर परिसरात रवाना केले. या पथकाने तरुणाचा शोध घेत त्याला सुखरूप सोडवले. त्याचवेळी पोलिसांनी आदित्य दरेकर (वय 24) आणि शब्बीर अब्दुल रेहमान खाल (वय 23) या दोन आरोपींना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, अपहरण केलेल्या तरुणाला आरोपींनी मारहाण केली होती. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोणत्याही गंभीर जखमा झाल्या नसल्याचे निष्पन्न झाले. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात एकूण सात ते आठ जण सहभागी होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर खंडणी, अपहरण, मारहाण आणि धमकावण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मालाड आणि कांदिवली परिसरातील रहिवासी असून, त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तरुणाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपींची पुढील चौकशी सुरू आहे.


