U19 Asia Cup Final : अंडर-19 आशिया कप: भारताची घोर निराशा; पाकिस्तानने 191 धावांनी नमवून जिंकली ट्रॉफी

•समीर मिन्हासची 172 धावांची ऐतिहासिक खेळी; 348 धावांच्या पाठलागात टीम इंडिया 156 धावांत गारद
U19 Asia Cup Final India vs Pakistan Final Match :- रविवारी पार पडलेल्या अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर निर्भेळ वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. 348 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाला अंतिम फेरीत मात्र पाकिस्तानने साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढत धूळ चारली.
समीर मिन्हासचा धडाका
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे अंगलट आला. पाकिस्तानचा सलामीवीर समीर मिन्हासने भारतीय गोलंदाजांची कत्तल करत 173 धावांची (113 चेंडू, 17 चौकार, 9 षटकार) विक्रमी खेळी केली. त्याला अहमद हुसेनने 56 धावांची जोड दिली. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत पुनरागमन करत पाकिस्तानला 347 धावांवर रोखले, तरीही हे आव्हान भारतासाठी खूप मोठे होते.
भारतीय फलंदाजी कोसळली
विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
कर्णधार आयुष म्हात्रे: केवळ 2 धावा करून बाद झाला.
वैभव सूर्यवंशी: 10 चेंडूत 26 धावांची आक्रमक सुरुवात केली, पण तो ही लवकर बाद झाला.
मध्यफळीची शरणागती: 10 षटकांच्या आत भारताचे 5 फलंदाज अवघ्या 68 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
अली रझाचा ‘स्पेल’ आणि भारताचा पराभव
पाकिस्तानच्या अली रझाने 42 धावांत 4 बळी घेत भारताच्या डावाला खिंडार पाडले. भारताकडून दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक 36 धावा केल्या, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. अखेर भारताचा डाव 26.2 षटकांत 156 धावांवर आटोपला.



