क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Virar Crime News : विरारमध्ये दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; 5 गुन्हे उघड, 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Virar Crime Branch News : बाथरूमची खिडकी उचकटून करायचा प्रवेश; विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई

विरार | दिवसा घरफोडी करून नागरिकांच्या कष्टाची कमाई लांबवणाऱ्या एका 21 वर्षीय सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. तन्मय शिवाजी तारमळे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे विरार, अर्नाळा आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांतील घरफोडीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व येथील हिलपार्क जवळील ‘प्रिन्से अपार्टमेंट’मध्ये राहणाऱ्या मयूरी जाधव यांच्या घरी 23 डिसेंबर रोजी दिवसा घरफोडी झाली होती. चोरट्याने बाथरूमच्या खिडकीची ग्रील उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन पथकांकडून तांत्रिक तपास

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेची तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कारगिल नगर, मनवेलपाडा येथून संशयित तन्मय तारमळे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.

एका अटकेतून 5 गुन्हे उघड

आरोपी तन्मय याच्याकडे केलेल्या तपासात त्याने विरारमधील 2, अर्नाळ्यातील 2 आणि मुंब्रा येथील 1 अशा एकूण 5 घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विरारमधील गुन्ह्यांतील 4 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या पोलीस पथकाची कामगिरी ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे, पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड, प्रतापराव कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0