Mumbai Rape News : मालवणीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार: दोन नराधम अटकेत!

•अमानुष अत्याचाराने मुंबई हादरली; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दीड महिना शोषण
मुंबई | मुंबईच्या मालवणी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या आईला अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवल्याने हे घृणास्पद कृत्य समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी फेब्रुवारी महिन्यात तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रिणीने तिला एकटे सोडून घरातून बाहेर पडताच, तिथे एक 23 वर्षीय तरुण आला. या तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार करत त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने आपल्या दुसऱ्या मित्राला पाठवला. या दुसऱ्या आरोपीने याच व्हिडिओचा वापर करून पीडित मुलीला धमकावणे सुरू केले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुलीला गोराई येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतरही नराधमांचा क्रूरपणा थांबला नाही. आपली बदनामी होईल या भीतीने पीडित मुलगी गप्प राहिली. याच भीतीचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी पुढील दीड महिन्याच्या कालावधीत तिला वारंवार धमकावून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईला ६ जून रोजी ती अश्लील क्लिप पाठवण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी मालवणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
मालवणी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ५६ (१), ३ (५) अन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरित तपास सुरू करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक २३ वर्षीय असून तो ओला चालक आहे, तर दुसरा आरोपी मालवणी परिसरात पाळीव कुत्रे सांभाळण्याचे काम करतो. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.


