Supriya Sule : “ठाकरे नाव अडगळीला जाणारं नाही, ते महाराष्ट्राचं अभिमान आहे” – सुप्रिया सुळे यांचा ठाम विश्वास

•राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचे स्वागतच आहे ; खासदार सुप्रिया सुळे
हिंजवडी, पुणे | “ठाकरे ब्रँडला कोणीही संपवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेता नव्हते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक होते,” असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी मनापासून स्वागत करत “ठाकरे हे फक्त आडनाव नसून, प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजाचं नाव आहे” असं भावनिक वक्तव्य केलं.
त्याचवेळी, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत स्पष्ट आरोप केला की, “ही परिस्थिती सरकारच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली आहे.” हिंजवडीमधील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी सरकारला 26 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. “वेळेत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडू; आणि सुधारणा झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचा मी स्वतः सत्कार करीन”, असा दम भरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश करावा की नाही, या प्रश्नावर सुळे यांनी ‘जनतेचं मत महत्त्वाचं’ असल्याचं नमूद करत विकासाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.



