“काटकसरीचा सल्ला देणारेच चांदीच्या ताटात शाही थाळीवर!”

•अंदाज समितीच्या परिषदेत लाखोंचा खर्च; चांदीची ताटं, वातानुकूल शामियाने, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा थाट
मुंबई | राज्य व संसदीय अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद मुंबईत दोन दिवस रंगली, मात्र या बैठकीच्या नावाखाली शाही थाटाचा अविष्कार बघायला मिळाला. काटकसरीचा मंत्र देणाऱ्या समितीने स्वतःच्या स्वागतासाठी चांदीच्या ताटात जेवण, वातानुकूल शामियाने, पंचतारांकित निवास आणि थेट सांस्कृतिक सोहळ्यांची मेजवानी उभी केली. यावर शेकडो नाही, तर लाखो रुपयांचा खर्च केल्याचं आता समोर आलं आहे.
या दोन दिवसांच्या परिषदेत देशभरातून आलेले अंदाज समितीचे सुमारे 600 पाहुणे सहभागी झाले. त्यांच्यासाठी हॉटेल जात पॅलेस आणि ट्रायडंटमध्ये निवास, विधिमंडळाबाहेर 40 फूट उंचीचे फलक, मलमली वातानुकूल शामियाने, झुंबरे आणि लाल गालिच्याची मांडणी करण्यात आली होती. सर्व पाहुण्यांचे भोजन चांदीच्या ताटांमध्ये झालं, ज्यासाठी एका ताटाचे दिवसाचे भाडे 550 रुपये तर एक थाळी जवळपास 4 हजार रुपये होती.
निखील केटरर्सच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, खास मेन्यू तयार करण्यात आला होता – कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, पुरणपोळी अशा चविष्ट पदार्थांनी पाहुण्यांचं ताट सजवलं गेलं.
विरोधकांचा संताप : “चांदीच्या ताटात जेवण, आणि जनतेला उपासमारी?”
सत्ताधाऱ्यांच्या या शाही स्वागतावर आता राजकीय रणकंदन उभं राहिलं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, “शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, योजनांचा ठप्प कारभार आणि दुसरीकडे आमदारांचं चांदीच्या ताटात पंचतारांकित जेवण… हे सरकार जणू जनतेच्या जखमांवर मीठ चोळत आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सडकून टीका करत विचारलं, “जनतेसाठी निधी नसतो, पण चांदीच्या ताटांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशाच्या आधारावर झाली? हा अंदाज आहे की अंधश्रद्धा?”


