Thane Crime News : ०४ अग्निशस्त्रे व ०८ काडतुसे विक्रीकरिता आलेल्या तीन इसमांना अटक : खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ठाणे | गणेशोत्सव तसेच आगामी ईद-ए-मिलाद या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना अवैध शस्त्रांची विक्री, अंमली पदार्थांचा व्यापार व इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत खंडणी विरोधी पथकाने ३० ऑगस्ट रोजी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून तीन इसमांना अवैध शस्त्रांसह अटक केली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सचिन कुंभार यांनी कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचला. त्यावेळी आरोपी अक्षय नथनी सहानी (२०, उत्तर दिल्ली), बिंदु धरमविरसिंग गौर (२६, उत्तर प्रदेश) आणि आकाश दुर्गाप्रसाद वर्मा (२३, सेंट्रल दिल्ली) हे ताब्यात मिळाले. त्यांच्या जवळून २ देशी बनावटीचे पिस्तूल, २ देशी कट्टे व ८ जिवंत काडतुसे असा एकूण ₹१,८२,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपींनी परवान्याविना धोकादायक शस्त्र बाळगून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, कल्याण येथे गुन्हा रजि. क्र. ९५२/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी ऑपरेशनमध्ये वपोनि शैलेश साळवी, सपोनि सुनिल तारमळे, पोउनि सचिन कुंभार, पोउनि सुभाष तावडे यांच्यासह खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



