ठाणे

Thane Crime News : 14 वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद

•अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकाऱ्यावरील हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक

ठाणे :- तब्बल 14 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका गंभीर खून प्रकरणातील आरोपीला ठाणे शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली आहे. 2011 साली अंबरनाथ येथे शिवसेना पदाधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हा आरोपी होता.

2011 साली अंबरनाथ पूर्वेकडील खुटवली गावातील शिवसेना पदाधिकारी अरविंद वाळेकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षक सागर सुंदर यादव याचा मृत्यू झाला होता, तर दुसरा अंगरक्षक राकेश यादव याने केलेल्या गोळीबारात हल्लेखोरांपैकी एक मनीष कुमार ऊर्फ बब्लू झा/शर्मा हा जागीच ठार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यावेळी बबुसिंग उर्फ नंदलाल शहा, ब्रिजेश हर्ष बहादुर सिंग, प्रदीप जावरेकर आणि राजेश सिंग उर्फ गोरखनाथ सिंग या चार आरोपींना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला हा तेव्हापासून फरार होता.

गुन्हे शाखा ठाणे शहराची मोठी कारवाई; तांत्रिक विश्लेषणाने आरोपीचा ठावठिकाणा उघड

गेली 14 वर्षे भैय्याजी उर्फ राजेश शुक्ला आपले अस्तित्व लपवून विविध ठिकाणी राहत होता. मात्र, मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. पोलीस हवालदार दादासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी गुजरातमधील सुरत येथे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, तात्काळ एक पोलीस पथक गुजरातेकडे रवाना झाले. 16 सप्टेंबर 2028 रोजी ठाणे पोलिसांनी पलसाना चौक, सुरत येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (वय 51, मूळ रा. सुकुलपूर, जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले.

आरोपीचा सहभाग निश्चित झाल्यावर त्याला वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. श्री. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव,सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे (शोध-2) यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार दादासाहेब पाटील, पोलीस नाईक दिनकर सावंत,अंकुश शिंदे आणि पोलीस शिपाई मयूर शिरसाट या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0