मुंबई

जनसुरक्षा विधेयकावर काँग्रेस नेते गडबडले; हायकमांडकडून स्पष्टीकरणाची नोटीस!

•विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांच्याकडून मागवला रिपोर्ट – विरोधात ढील का दिली?

मुंबई | महाराष्ट्र विधानसभेत काही दिवसांपूर्वी पारित झालेल्या जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. या विधेयकाविरोधात स्पष्ट, आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना ती दिसून न आल्याने आता काँग्रेस हायकमांडने वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल मागवला आहे. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे, अशी माहिती मिळत आहे.

विधेयकावर अपेक्षित विरोध का झाला नाही? सभागृहात कोण काय बोललं? हे सर्व स्पष्ट करणारा अहवाल मागवण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी “मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मी त्या दिवशी सभागृहात नव्हतो. मी असतो, तर विधेयक फाडून टाकलं असतं,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी असंही स्पष्ट केलं की, पक्षाकडून विरोध कसा करायचा याविषयी एक नोट दिली होती, मात्र सरकारने “समितीत चर्चा झाली आहे” असे सांगून मुद्दा गडबडीत पुढे रेटला.

12 हजार आक्षेप नोंदवलेले असले तरी विधेयकावर अपेक्षेप्रमाणे आक्रमक विरोध झाला नाही, याचीच खंत वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. “महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही,” असंही ते म्हणाले.

दरम्यान, सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “विजय वडेट्टीवार यांच्याशी याबाबत बोलणं होईल. समितीत सूचना दिल्या होत्या. आता काय नेमकी भूमिका घेतली ते पक्षश्रेष्ठींना सांगू.”काँग्रेसमध्ये या प्रकरणावरून अंतर्गत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. यावर पुढे काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0