मुंबई

Thackeray Gat Vs Shinde Gat : ठाकरे गटाचा शिंदे गटाला ‘दिघे’ पलटवार; कल्याण उपकेंद्राच्या नावावरून दोन दिवसांची अल्टीमेटम

•कल्याण विद्यापीठाच्या उपकेंद्रात एकच कर्मचारी, अस्वच्छता, पाण्याचा तुटवडा; विद्यार्थ्यांतून तीव्र नाराजी

कल्याण | कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये वर्षांपूर्वीच मंजूर झाला असला, तरी अद्याप नाव देण्यात आलेले नाही. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या युवासेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून, दोन दिवसांत नाव देण्यात आले नाही, तर आम्हीच नामकरण सोहळा करू, असा इशारा दिला आहे.

युवासेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी स्पष्टपणे म्हटले की, “कल्याण उपकेंद्राचे उद्घाटन झाल्यापासून आजतागायत कोणतेही ठोस विकासात्मक पाऊल उचलले गेलेले नाही. इतकेच नव्हे तर संपूर्ण संकुलात एकच कर्मचारी असून केंद्र प्रमुखाचीही कायमस्वरूपी नेमणूक झालेली नाही. हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरण्याऐवजी त्रासदायक बनले आहे.”

2014 साली स्थापन झालेल्या कल्याण उपकेंद्रात विद्यार्थ्यांनी अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. धुळीचे साम्राज्य, स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, पुस्तकांची कमतरता, प्रसाधनगृहांची दुर्दशा, अग्निशमन यंत्रणा नसणे, आयडॉल अभ्याससाहित्य मिळत नसणे अशा गंभीर अडचणी आहेत. यामुळे विद्यार्थी मनःस्ताप सहन करत असून शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही आनंद दिघे यांचे नाव आणि ठाणेची राजकीय ओळख अत्यंत महत्त्वाची वाटते. मात्र आता हेच नाव राजकीय टोकाचे शस्त्र बनले असून, युवासेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0