Sant Tukaram Palkhi 2025 : तुकोबांच्या पालखीचा भक्तिभावात प्रस्थान सोहळा संपन्न; पंढरपूरच्या दिशेने भाविकांची दिंडी सज्ज

•मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, श्रीरंग बारणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात आज मुक्काम
पुणे | जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची 340 वी पालखी वारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात देहूनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. सोमवारपासूनच देहू नगरीत हजारो वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात भक्तांनी तुकोबांचे दर्शन घेतले.


पावसाच्या साक्षीने झालेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि आमदार सुनील शेळके हे मान्यवरही या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
पालखी देहू नगरीतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा येथे पहिली आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. उद्या तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू करेल.
वारीसोबत चालणाऱ्या प्रत्येक दिंडीमध्ये भगवी पताका, फुगडी खेळणारे वारकरी, टाळ-मृदुंगाचा गजर, आणि “तुकोबांच्या पालखीच्या नामगजराने” वातावरण भक्तिमय झाले आहे. देहू आणि आळंदी येथे वर्षातून एकदाच येणाऱ्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी येतात आणि ‘देहभान विसरून’ भावविश्वात झोकून देतात.



