Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची गृहखात्याने घेतली दखल; चौकशीसाठी तीन विशेष पथके स्थापन

•शिवाजी पार्कात तणावाचे वातावरण, सरकारवर अपयशाचा आरोप; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
मुंबई :- दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या ‘माँसाहेब’ मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज (17 सप्टेंबर) सकाळी अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेची राज्याच्या गृहखात्याने तात्काळ दखल घेतली असून, दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांची तीन विशेष पथके स्थापन केल्याची माहिती दिली आहे.
मीनाताई ठाकरे यांना तमाम शिवसैनिकांमध्ये आदराचे स्थान आहे. त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, संतप्त शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात मोठी गर्दी केली. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात तातडीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “हा विषय आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. माँसाहेब तमाम शिवसैनिकांच्या आई होत्या. त्यामुळे दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.”
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल देसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, “मीनाताईंच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यात सरकारला अपयश आले आहे,” असा आरोप केला आहे. तर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



