ठाणे

मनसेचा ‘दणका’! – निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच कळवा-मुंब्रा येथील निवडणूक आयोगाचे कार्यालय फोडले; संतप्त कार्यकर्त्यांनी संगणक तोडले

•मतदार यादीतील ‘घोळा’ने संतापले कार्यकर्ते; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अधिकारी हतबल; राज ठाकरेंच्या मागणीनंतरही घोळ कायम राहिल्याने गंभीर परिणाम

ठाणे :- महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच एक मोठी आणि तणावपूर्ण घटना समोर आली आहे. मतदार यादीतील घोळावर प्रचंड संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात थेट मनसे स्टाईलने दणका दिला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील संगणक फोडल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला.

संतापाचे कारण

मनसे कार्यकर्ते मतदार यादीमधील त्रुटी आणि घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी या कार्यालयात गेले होते. तेव्हा त्यांना धक्का बसला. संपूर्ण मतदारसंघाची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपलब्ध होता. अपुरे मनुष्यबळ आणि मतदार यादीतील त्रुटींसंदर्भात अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संयम सुटला. त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट निवडणूक कार्यालयातील संगणकांवर हल्ला चढवला आणि ते फोडले.

मनसेचा इशारा

या घटनेनंतर मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी निवडणूक आयोगाला कठोर इशारा दिला आहे. “निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून काम करत असेल, तर आम्ही काय करायचं? सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईल दणका देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मतदारसंघातील याद्या तातडीने अद्ययावत न केल्यास पुन्हा ‘मनसे स्टाईलने’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. इतकेच नाही तर, मनसेकडून 149 मतदार संघाबाबत लवकरच कोर्टात पीएल (PIL) दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0