मुंबई

Maharashtra Politics : हिंदी सक्तीविरोधात आंदोलन, ठाकरे गटाला ‘विजयी मेळाव्या’पूर्वी मोठा दणका!

•जमाबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई :– राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या विरोधात निर्माण झालेल्या संतप्त वातावरणात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र होते. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतल्याने 5 जुलै रोजी नियोजित भव्य मोर्चा रद्द करण्यात आला असला तरी, त्याऐवजी ‘विजयी मेळाव्याचे’ आयोजन करून ठाकरेंनी पुन्हा मैदान गाजवण्याची तयारी केली आहे.

मात्र याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या रविवारी मुंबईतील आझाद मैदानात हिंदी सक्तीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान त्रिभाषा जीआरच्या प्रतीची होळी करण्यात आली होती. परंतु यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि पोलीस आयुक्तांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने हे प्रकरण आता कायदेशीर वळणावर गेलं आहे.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 190, 223 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, यात शालेय अभ्यास आणि कृती समितीचे दीपक पवार, ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख संतोष घरत, संघटिका युगेंद्रा साळेकर यांचा समावेश आहे.

या घडामोडीमुळे एकीकडे ५ जुलैच्या ‘विजयी मेळाव्या’साठी जोमात तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय तापमान वाढले आहे. आता या परिस्थितीत ‘विजयी मेळावा’तून ठाकरे बंधू कोणता राजकीय संदेश देतात आणि हिंदी सक्तीविरोधातील संघर्षाची दिशा काय राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0