Mumbai Fake Police News : तोतया पोलिसांचा बनाव देवनार पोलिसांकडून उधळला! 13 लाखांच्या लुटीसह बनावट पोलीस टोळीला रंगेहाथ बेड्या

•गोवंडीत निवृत्त महिलेला लुटण्याचा प्रयत्न फसला; बनावट नंबर प्लेट असलेली ‘इर्टीगा’ आणि लाठ्या जप्त; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कामगिरी
मुंबई l पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा देवनार पोलिसांनी अत्यंत धाडसाने पर्दाफाश केला आहे. गोवंडी येथील के.डी. जंक्शन परिसरात एका निवृत्त महिलेकडून तब्बल 13 लाख रुपये लुटून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी बनावट नंबर प्लेट असलेल्या इर्टीगा कारसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांसारख्या लाठ्या बाळगून आणि पोलिसांचा रुबाब दाखवून ही टोळी जबरी चोरी करत असल्याचे तपासात समोर आले असून, देवनार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
ही घटना के.डी. जंक्शन, करबला मशीद जवळ घडली. एका पांढऱ्या रंगाच्या इर्टीगा वाहनातील काही इसम हातात पोलिसांच्या लाठ्या घेऊन क्रेटा कारमधील प्रवाशांशी हुज्जत घालत होते. यावेळी कर्तव्यावर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पांडुरंग यादव, त्यांच्या पथकातील कर्मचारी आणि मोबाईल-5 वरील पथकाच्या हे निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेऊन इर्टीगामधील इसमांची चौकशी सुरू केली. यावेळी वाहनाचा चालक प्रवीण शिवनारायण पांडे, निसार अहमद उर्फ सलीम सावान शेख आणि संजयकुमार जगन्नाथ दुबे यांची धरपकड करण्यात आली. याच दरम्यान तक्रारदार महिला अनिता जोस मिरांडा (वय 58) यांनी तिथे पोहोचून आपली 13 लाख रुपयांची रोकड या तोतया पोलिसांनी जबरीने चोरल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडून चोरी केलेली पूर्ण 13 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यात ५०० रुपयांच्या 2400 नोटा (12 लाख रुपये) आणि 200 रुपयांच्या 500 नोटा (1 लाख रुपये) असा समावेश आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली बनावट नंबर प्लेट लावलेली इर्टीगा कार आणि पोलिसांच्या लाठ्यांसारख्या दिसणाऱ्या दोन लांब काळ्या मुठीच्या लाठ्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी रमेश यादव, सपोनि कुणाल बागुल, सपोनि कैलास सोनवणे, मपोउनि भावना वैद्य आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळात हा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


