Pune Crime News : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

पुणे : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे व आरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २० मोबाईल फोन, किंमत अंदाजे १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी रूतुराज काटकर यांच्या मित्राचा मोबाईल (किंमत ₹१५,०००) दिनांक ३० ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे स्टेशनवरून चोरला गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम मंगळवार पेठेत झोपडीत राहतात व मोबाईल चोरी करून विक्री करतात.
लोहमार्ग पोलिसांच्या सर्व्हेलन्स पथकाने व आरपीएफच्या टीमने मंगळवार पेठेत छापा टाकून दोन संशयितांना पकडले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
- बुद्धराज मोरपाल बागडी (३२, मूळ राजस्थान)
- अमरलाल हंसराज बागडी (२२, मूळ राजस्थान)
त्यांच्या ताब्यातून विवो कंपनीसह विविध कंपन्यांचे एकूण २० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींनी मोबाईल चोरी करून ते जुना बाजारात कमी किंमतीत विकल्याचे कबुल केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पो.उ.नि. यशवंत साळुंके, आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्यासह पथकातील अंमलदार सहभागी होते.



