Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळच्या वेळेस भूकंपाचे जोरदार झटके!

Delhi-NCR Earthquake News : रिक्टर स्केलवर 4.4 तीव्रतेचा भूकंप; हरियाणातील झज्जर येथे केंद्रबिंदू
ANI :- दिल्ली-एनसीआरसह हरियाणातील अनेक भागांना आज (10 जुलै) सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली. झटके जवळपास 10 सेकंदांपर्यंत जाणवले. झज्जरपासून 10 किमी उत्तरेस, 10 किमी खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली.
गुरुग्राम, सोनीपत, बहादुरगड, जींद, तसेच यूपीमधील मेरठ, हापुड़ आणि शामली येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक बहुमजली इमारतींमध्ये झटके विशेषतः तळमजल्यावर अधिक तीव्रतेने जाणवले. भीतीमुळे लोक आपल्या घरातून व कार्यालयातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. झटके जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोक कामावर असतानाच जमिनीखालून हादरे; कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने, या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या वेळी अनेकजण कार्यालयात किंवा प्रवासात होते. अचानक आलेल्या झटक्यांमुळे सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू ठेवत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.



