मुंबई

Monsoon Update : आजपासून शहरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

कोकण, पुणे घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार; सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

मुंबई :- मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज, शुक्रवारपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईला आज ‘यलो अलर्ट’ तर ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे सध्या राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम दिशेला सरकणार असल्याने याचा थेट परिणाम मुंबई आणि महाराष्ट्रावर होईल. शुक्रवार संध्याकाळपासून शनिवार संध्याकाळपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी मात्र पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक राहील. तसेच, उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात देशात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या महिन्यात देशात सरासरीपेक्षा 109 टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे, तर कोकणात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0