Virar Crime News : 9 वर्षांनी ‘तो’ अखेर सापडला! जुन्या खुनाचा गुंता गुन्हे शाखा, विरारने सोडवला

•2019 मधील खळबळजनक खुनाच्या प्रकरणातील आरोपीला ठाण्यातून अटक,5 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर गुन्हे शाखेला यश
विरार :- तब्बल 9 वर्षांपूर्वी विरारमध्ये घडलेल्या एका भीषण खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरारच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सोनू अच्छेलाल गुप्ता (35 वय) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला ठाण्याहून ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही घटना 30 ऑक्टोबर 2016 रोजी घडली होती. आरोपी रतन झा एका अनोळखी मुलाला मारहाण करत असताना फिर्यादीचा भाऊ सोनू झा भांडण सोडवण्यासाठी पुढे आला. याचा राग मनात धरून आरोपीने सोनू झा आणि इतरांना त्याच्या 15 ते 16 साथीदारांसह लाकडी बांबू, हॉकी स्टीक आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सोनू झा गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान 16 नोव्हेंबर 2016 रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर, विरार पोलीस ठाण्यात सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम (302) वाढवण्यात आले होते.
गेली 9 वर्षे फरार असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उपआयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-3, विरारच्या पथकाने गेल्या 5 महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात पोलिसांना यश आले. अखेर, ठाणे पश्चिम येथे लपलेल्या आरोपी सोनू गुप्ताला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, सागर बारवकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, सुनील पाटील, युबराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, आणि सायबर पोलीस ठाण्याचे स.फौ. संतोष चव्हाण यांनी ही कामगिरी यशस्वी केली. 9 वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपीला पकडल्यामुळे या पथकाचे कौतुक होत आहे.


