Dombivli Crime News : डोंबिवलीत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिला दलालास अटक; तीन पिडीत महिलांची सुटका

•हॉटेलच्या आड फूस लावून चालवला जात होता देहव्यवसाय; पोलिसांचा सापळा यशस्वी
डोंबिवली | डोंबिवली पूर्वमधील सोनारपाडा भागात एका हॉटेलच्या आड लपवून ठेवण्यात आलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत क्राईम ब्रँचनं महिला दलालास अटक केली असून, तिच्या ताब्यातील तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही धडक कारवाई 30 जून रोजी सायंकाळी करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हॉटेल रूची लॉजिंग या ठिकाणी एका महिला दलालकडून काही असहाय्य महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी आणले जात होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर ठिकाणी सापळा रचला आणि हॉटेलवर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी महिला दलालाला रंगेहात पकडत तिला ताब्यात घेतलं. तिच्या ताब्यातील तीन पिडीत महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत पुनर्वसनासाठी सोपवले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने आणि धाडसीपणे सहभाग घेतला.


