
IndiGo Flights Cancellation LIVE: ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’च्या अंमलबजावणीत इंडिगो अपयशी; वैमानिकांच्या तुटवड्याने कर्मचाऱ्यांची कमतरता; ‘डीजीसीए’कडून नियम मागे, सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा
ANI :- देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घालून दिलेल्या नवीन आणि कडक नियमांमुळे मोठा फटका बसला आहे. IndiGo Flights Cancellation LIVE गेल्या काही दिवसांत इंडिगोची 500 हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली असून, कंपनीची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र, आता डीजीसीएने ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) शी संबंधित सर्व निर्देश मागे घेतल्यामुळे इंडिगोसह देशभरातील विमान कंपन्यांची सेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
इंडिगोसमोरचे संकट
‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील चुकीचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचा चुकीचा अंदाज यामुळे इंडिगोसमोर हे मोठे संकट उभे राहिले. नवीन नियमांनुसार लागणारे अतिरिक्त वैमानिक आणि क्रू सदस्यांची भरती कंपनीने केली नाही, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आणि विमानसेवा ठप्प झाली.
काय आहेत नवे नियम?
वैमानिक, कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘डीजीसीए’ने कामाच्या तासांबाबत नवी नियमावली बनवली होती. याचा उद्देश शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करणे हा होता.या नियमांनुसार, वैमानिकाचे कामाचे साप्ताहिक तास 48 वरून 36 करण्यात आले होते.रात्री विमाने उतरवण्याची मुभा सहावरून दोनवर आणली गेली.दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कामाचे तास निश्चित करण्यात आले होते.
इंडिगोचे नियोजन चुकले
डीजीसीएने हे नियम दोन टप्प्यांत लागू केले होते. दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली.
वैमानिकांचे कामाचे तास कमी केल्यानंतर नव्या वैमानिकांची मोठी गरज भासणार होती, पण इंडिगोने त्यासाठी पुरेशी व्यवस्था केली नाही.
नोव्हेंबर-डिसेंबर हा सुट्ट्यांचा आणि वाढीव उड्डाणांचा काळ असतो. एका बाजूला वाढीव उड्डाणे आणि दुसऱ्या बाजूला अपुरी कर्मचारी संख्या या दोन समस्यांमुळे इंडिगोची सेवा कोलमडली. डीजीसीएने नियम मागे घेतल्यामुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


