Mumbai Crime News : दोन गटातील वादात ‘गैरवर्तन’ भोवले! ओशिवरा पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी निलंबित, 5 पोलिसांची चौकशी

•जोगेश्वरीतील घटनेनंतर तीव्र पडसाद; राजकीय कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे आदेशात नमूद
मुंबई :- मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित अन्य 5 पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर परिमंडळ-9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
प्रकरणाचा तपशील आणि आरोप
मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025 रोजी जोगेश्वरीच्या आनंद नगर येथे दोन समुदायांमध्ये वाद झाला होता, ज्यात एका दुकानदारावर हल्ला करण्यात आला होता. या दुकानदाराच्या समर्थनार्थ एका राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते ओशिवरा पोलीस ठाण्यात जमा झाले होते. त्याचवेळी, एक महिला लैंगिक अत्याचाराची तक्रार देण्यासाठीही पोलीस ठाण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश केंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गायके, पोलीस उपनिरीक्षक बाबू तोटरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्वे आणि पोलीस शिपाई अजिम झारी यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला होता.
घडलेली कारवाई
या तक्रारीच्या अनुषंगाने, परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी तात्काळ कारवाई करत दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, उर्वरित 5 पोलिसांविरोधात वांद्रे विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची सात दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निलंबन आदेशातील ठपका
निलंबनाच्या आदेशात पोलिसांनी केलेल्या कृत्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. कायद्याचे ज्ञान अवगत असतानाही या पोलिसांनी केलेले कृत्य हे पोलीस दलास अशोभनीय असून, त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांचे कृत्य हे पोलीस दलास काळिमा फासणारे असून, त्यांची सचोटी संशयास्पद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.



