Sanjay Shirsat : महायुतीत ‘फाटाफूट’चा राजकीय भूकंप! – डोंबिवलीत शिंदे गटाचे नेते भाजपामध्ये; संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना ‘स्वतंत्र लढण्या’चा थेट इशारा

•सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजीत, विकास देसले यांचा भाजपामध्ये प्रवेश; शिरसाट म्हणाले, “ॲक्शनला रिॲक्शन होणारच, डोंबिवली-कल्याण कशाला बघता?”
डोंबिवली :- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत महायुतीमधील फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 3 डिसेंबर रोजी शिवसेना (शिंदे गट) मधील पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने महायुतीमधील तणाव वाढला आहे. यामुळे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका करत ‘स्वतंत्र लढण्या’चा इशारा दिला आहे.
डोंबिवलीत शिंदेंना धक्का
रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजीत थरवळ आणि कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील या फोडाफोडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
संजय शिरसाट यांचा पलटवार
शिंदेंचे विश्वासू शिलेदार फोडल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग ॲक्शनला रिॲक्शन होणारच.”
“रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता? त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल.” “अशापद्धतीने फाटाफूट झाली, तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू.”
शिंदे गटाकडून थेट प्रश्न
डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केले. “सांस्कृतिक नगरीत रवींद्र चव्हाण कुठल्या दिशेला चाललेले आहेत? त्यांची भूमिका योग्य नाही. इतक्या मोठ्या पदावर असून चार वेळा आमदार, एक वेळा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झालेत, तरी त्यांना स्वतःचे गड, शहर आणि मतदारसंघ बांधता आले नाही. त्यांनी कोणत्या बेसवर भाजपा पक्षाने प्रदेशाध्यक्ष केले आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
तसेच, “शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते फोडले, त्यातून हजार कार्यकर्ते करण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसेना-भाजपची युती अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. हे रविंद्र चव्हाण यांनी लक्षात ठेवावे,” अशी आठवणही शिंदे गटाने करून दिली.


