Mumbai Crime News : ‘डॉक्टर’च्या नावाखाली डिस्ट्रीब्युटरची फसवणूक!

•व्हर्च्युअल डॉक्टर बनून 5.66 लाखांची औषधे लंपास
मुंबई | व्हॉट्सअॅपवर डॉक्टर बनून औषधं मागवणं, चकाचक ऑर्डर आणि बाऊन्स चेक… शीव पोलिसांनी अशाच क्लृप्तीचा पर्दाफाश करत हरियाणातील दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी मेडिकल डिस्ट्रीब्युटरचा विश्वास संपादन करून 5 लाखांहून अधिक किमतीची औषधे उचलली आणि फसवणूक केली. पोलिसांनी या दोघांकडून एकूण 6.31 लाखांची औषधे, मोबाईल फोन, कोरे चेक आणि डेबिट कार्ड जप्त केलं आहे.
गुन्हा 30 एप्रिल ते 2 मे 2025 दरम्यान घडला. एका अज्ञात इसमाने फिर्यादीशी संपर्क करून तो “व्ही.एन. देसाई हॉस्पिटलचा डॉक्टर दिपांशु वर्मा” असल्याचे सांगितले. तातडीची गरज भासवून औषधांची मागणी केली आणि चेक देऊन माल घेतला. काही दिवसांनी चेक वठले नाहीत हे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
शीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषण सुरू केले असता, आरोपी मुकेश तलेजा व त्याचा साथीदार हे हरियाणातील रोहतकहून मुंबईत येत असल्याचे निष्पन्न झाले. ते इंडिया मार्टवरून डिस्ट्रीब्युटर्सचा डेटा घेत आणि फेक नावाने संपर्क करत फसवणूक करत होते.
कामोठे, नवी मुंबई येथे ते पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळताच, सायबर पथकाने सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या. चौकशीतून समोर आलं की तलेजा हा पूर्वी फार्मा कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता आणि याच अनुभवाचा गैरवापर करत फसवणूक करत होता.
त्यांच्याकडून पोलिसांनी 5 मोबाईल फोन, 13 कोरे बँक चेक, एक डेबिट कार्ड आणि विविध मेडिकल स्टोअर्सकडून फसवणूक करून मिळवलेली औषधे हस्तगत केली आहेत. याशिवाय, अजूनही काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सायबर अधिकारी सपोनि दत्तात्रय खाडे, कुंभार, पवार आणि पोलीस हवालदार ठोके यांनी केली. त्यांच्या या गतिमान व कौशल्यपूर्ण कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.


