मुंबई
राज्यात अतिवृष्टीचा कहर – मुख्यमंत्री सतत संपर्कात, प्रशासन अलर्ट मोडवर
पुणे, सातारा, मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार बचावकार्य वेगात; एनडीआरएफ, पोलिस, महापालिका सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस यांचा आढावा
मुंबई :- राज्यात गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई व एमएमआर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर सतत नजर ठेवून असून, त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून मदतकार्य हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी सातत्याने संपर्कात आहेत.
प्रमुख घटक:
- पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. पावसाची नोंद झाली. बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, 70-80 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
- सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात 6 जणांना पुरातून वाचवण्यात आले, पंढरपूरमध्ये भीमा नदी पात्रात अडकलेल्या 3 जणांचे बचावकार्य सुरू आहे.
- फलटणमध्ये 163.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एनडीआरएफची चमू अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे.
- रायगडमध्ये एक जण वीज पडून मृत्युमुखी पडला. महाड–रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आला आहे.
- मुंबईत 135.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, 18 शॉर्टसर्किट, 6 ठिकाणी पाणी साचणे, 5 ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या. कोणतीही प्राणहानी झालेली नाही.
- हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुंबईत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा दिला आहे.
सर्व यंत्रणा पूर्ण सज्ज असून, आपत्कालीन मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम्स विविध ठिकाणी तैनात आहेत.


