Naresh Mhaske : नवी मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसणार’; खासदार नरेश म्हस्के यांचा गणेश नाईकांना खुलं आव्हान!

•ठाण्यात युती, तर शेजारी स्वबळ; प्रचारात उडणारी ‘त्रिधातिरपीठ’ आणि युती फिसकटण्यामागचे खरे कारण म्हस्केंनी मांडले
नवी मुंबई/ठाणे | ठाणे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी (Election 2026) वातावरण तापले आहे. ठाण्यात शिवसेना-भाजप युती करून लढत असतानाच, नवी मुंबईत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर, “नवी मुंबईत भगवा फडकणार आणि महापौर शिवसेनेचाच बसणार,” असा ठाम विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
युती का तुटली?
म्हस्केंनी स्पष्ट केली भूमिका नवी मुंबईत भाजप-शिवसेना युती का झाली नाही, यावर बोलताना म्हस्के म्हणाले, “नवी मुंबईत युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. युती झाली असती तर 111 पैकी 111 जागा आमच्या आल्या असत्या. मात्र, आमचे 56 नगरसेवक असूनही भाजप आम्हाला फक्त 20 जागा देण्यास तयार होती. इतक्या कमी जागा घेऊन आम्ही कार्यकर्त्यांचा अपमान करू शकत नव्हतो, म्हणूनच आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.”
प्रचारात उडणारी त्रिधातिरपीठ
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांची भौगोलिक सीमा लागून असल्याने प्रचाराचे नियोजन करताना कसरत होत असल्याचे म्हस्के यांनी कबूल केले. “एका शहरात (ठाणे) आम्ही युती म्हणून भाजपसोबत प्रचार करतो आणि शेजारच्या शहरात (नवी मुंबई) आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढावे लागत आहे. यामुळे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची थोडी त्रिधातिरपीठ उडते, मात्र परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आमच्याकडे आहे,” असे ते मिश्किलपणे म्हणाले.
गणेश नाईकांच्या उपस्थितीत महापौर बसवणार!
नवी मुंबईचे दिग्गज नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा सन्मान राखत म्हस्केंनी त्यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करतो. ते म्हणतात की भाजप एक नंबरचा पक्ष आहे, पण मी सांगतो की त्याच नेत्यांच्या उपस्थितीत आम्ही नवी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवून दाखवू.” भाजपचा मूळ केडर आणि संघाचे कार्यकर्तेही आमच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
निष्ठावान आणि संघाच्या
कार्यकर्त्यांना संधी नरेश म्हस्के यांनी यावेळी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली. “ज्यांनी नवी मुंबईत भाजप उभी केली, ते मूळ कार्यकर्ते आज आमच्यासोबत आहेत. आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तिकीट दिले आहे. इतर कोणी त्यांना संधी दिली नसेल, पण शिवसेनेने नेहमीच कार्यकर्त्यांना महत्त्व दिले आहे,” असे म्हणत त्यांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.


