सोलापूर

Solapur News : सोलापूरमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हाप्रमुखांवर प्राणघातक हल्ला; ‘दिग्विजय बागल यांच्या कार्यकर्त्यांनी सुपारी घेऊन मारहाण केल्याचा’ चिवटेंचा गंभीर आरोप

•करमाळ्यातील हिवरवाडी येथे शेतातून परतताना महेश चिवटेंच्या गाडीवर हल्ला; लाथा-काठ्यांनी बेदम मारहाण.

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे त्यांच्या शेतातून परतत असताना हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या महेश चिवटे यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘सुपारी घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न’

महेश चिवटे यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर करत, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हल्लेखोर मनोज लांडगे याने आपली गाडी अडवली आणि लाठा-काठ्यांनी बेदम मारहाण केली, असे चिवटे यांनी सांगितले.

चिवटे यांनी थेट भाजप नेत्या आणि मकाई कारखान्याच्या सर्वेसर्वा रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांच्यावर आरोप केला आहे. चिवटे म्हणाले, “आज सकाळी मी माझ्या शेतातून येत असताना रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने माझी गाडी अडवली… मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.”

चिवटेंचा ‘जशास तसं’ उत्तर देण्याचा इशारा

या हल्ल्यानंतर चिवटे यांनी हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे. “मी एवढच सांगेन यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुलाही भाऊ आहे हे लक्षात ठेव,” असे ते म्हणाले.

दरम्यान, महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. हल्ला झाल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला की वैयक्तिक कारणातून, याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0