Bhiwandi Crime News : भिवंडीत ‘दारूची नदी’ आटवली! – 1,115 लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

• गोपनीय माहितीवर आधारित छापा; आलिमघर येथील घरातून 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; एका आरोपीला बेड्या
भिवंडी (नारपोली) :- भिवंडी परिसरात अवैध गावठी दारूची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल 1,115 लिटर तयार हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
दिनांक 4 डिसेंबर रोजी पोलीस हवालदार किशोर थोरात यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने आलिमघर, भिवंडी येथील आरोपी रुपेश नारायण पाटील (वय 35) याच्या राहत्या घराशेजारील खोलीमध्ये छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 11 हजार 500 रुपये किंमतीची 1,115 लिटर हातभट्टीची तयार दारू असा मुद्देमाल हस्तगत केला.
याप्रकरणी आरोपी रुपेश पाटील याच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


