
Thackeray Brothers On ECI : मतदार यादीतील घोळ, माहिती गायब होणे आणि तक्रारींची दखल न घेतल्याने विरोधी पक्षांनी उगारली वज्रमूठ
मुंबई :- राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने थेट आयोगावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. मतदार यादीतील कथित घोळ आणि आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित करत विरोधी पक्षांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे वेबसाईट दुसरे कोणीतरी वापरत असल्याचा थेट आरोप केला. Maharashtra News
निवडणूक आयोगावर तांत्रिक गौप्यस्फोट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी यावेळी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, “एक बातमी चॅनलवर येते आणि खोट्या यादीची बातमी दाखवल्यावर सहा वाजता ती गायब होते. याबद्दल आयोगाकडे तक्रार दिली का, असे विचारले असता त्यांना काहीच माहीत नाही. त्यांच्या वेबसाईटवरून याद्या गायब होत असतील आणि आयोगाला माहीत नसेल, तर हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय? हे आयोगाने चौकशी करून सांगावे.”
सोयीच्या नावांचा ‘हिरवा’ आणि गैरसोयीच्या नावांचा ‘लाल’ पेन!
विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमध्ये मोठे ‘घोळ’ झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. शिष्टमंडळाने सांगितले की, सोयीची नावे हिरव्या पेनाने मार्क करा आणि गैरसोयीची नावे लाल पेनाने मार्क करा, असे आदेश देण्यात आले होते. तसेच, निवडणूक आयोगाने आलेल्या तक्रारींची दखल न घेता त्या ‘बासनात गुंडाळल्या’ असल्याचे दिसत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
पुरावे आणि उदाहरणे
विरोधी नेत्यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली:
नालासोपारा (सुषमा गुप्ता प्रकरण): 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता एका यादीत घोळ दिसला, पण 6 वाजता तो गायब झाला. आयोगाने साधी चौकशीही केली नाही.
मुरबाड: अनेक घरांसमोर फक्त ‘डॅश’ लिहिलंय, अशी 400 घरे आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट आणि नाशिक: नाशिकमध्ये एकाच घरात (क्रमांक 3829) तब्बल 813 मतदार असल्याचे पुरावे शिष्टमंडळाने सादर केले.
उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान
“मी हवेत बोलत नाही, सर्व पुरावे आहेत,” असे ठामपणे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “मतदार यादीतील या सगळ्या घोळामुळे आता हा चेंडू भाजपाच्या कोर्टात आहे. भाजपाने आमच्यासोबत यायला पाहिजे होते, त्यांनी या शिष्टमंडळात यायला पाहिजे.”
दरम्यान, 19 ऑक्टोबर रोजी पत्र देऊनही आयोगाने दखल न घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीसह मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


