मुंबई

Manoj Jarange Patil : ‘आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा’; मनोज जरांगे यांचा फडणवीसांना थेट इशारा

• ‘58 लाख नोंदी सापडल्या, मग रोडमॅप कशाला हवा?’; जरांगे यांची आक्रमक भूमिका

जालना :- मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने मराठा समाजाला आज संध्याकाळपर्यंत आरक्षण लागू करावे, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. 58 लाख मराठा-कुणबी नोंदी सापडल्या असल्याचा दावा करत, आता कोणताही ‘रोडमॅप’ किंवा ‘अभ्यास’ करण्याची गरज नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आज, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुंबईतील गणेशोत्सवामुळे मराठा आंदोलकांना आणि गणेशभक्तांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी ही विनंती प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच धुडकावून लावली.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

जरांगे पाटील म्हणाले, “मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्तऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप कशाला हवा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच 3 लाख ट्रक काढून फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने आणि फुलांच्या पाकळ्यांनी भरून टाकू.”
ते पुढे म्हणाले, “उगाच गोरगरिबांच्या लेकरांची नाराजी का घेता? मला जेलमध्ये टाकले तरी मी सडायला तयार आहे. जर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तुम्हाला आरक्षण देतो, पण तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या,’ तरीही मी तयार आहे.” यातून त्यांनी आरक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

सरकारचा प्रयत्न आणि जरांगेंची भूमिका

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी गाठली. त्यांनी मुंबईतील गणेशोत्सव आणि आंदोलनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी दादांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाचा मार्ग आणि मुक्कामाची माहिती घेतली आहे. गणेशभक्त आणि मराठा बांधव दोघांनाही त्रास होऊ नये, यासाठी मी त्यांना विनंती केली.”

मात्र, जरांगे यांनी माध्यमांसमोरच कोणतीही गुप्त चर्चा होणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि सरकारने केलेल्या विनंतीला दिलेल्या स्पष्ट नकारामुळे आता सरकारपुढील आव्हान वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0