Ajit Pawar : “मी मध्ये आलो तरी 353 लावा!” – हिंजवडीत पहाटे अजित पवारांचा खडसावणारा दौरा

•”IT पार्क बाहेर चाललाय… वाटोळं झालंय” म्हणत सरपंचांना फटकारलं; कामांमधील अडथळ्यांवर 353 दाखल करण्याचे आदेश
पुणे | पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (26 जुलै) पहाटेच्या सुमारास हिंजवडी परिसराचा धडाकेबाज दौरा केला. काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का, याची तपासणी करण्यासाठीच हा पाहणी दौरा करण्यात आला. मात्र दौऱ्याचा सूर नेहमीप्रमाणेच थेट आणि खडसावणारा होता.
हिंजवडीमधील वाहतूक कोंडी, अपूर्ण नागरी सुविधा, आणि विकासकामांतील अडथळे पाहून अजित पवार आक्रमक झाले. अधिकाऱ्यांनी “काही जण कामांना आडवे येत आहेत” अशी तक्रार मांडताच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “कोणीही मध्ये आलं तर त्याच्यावर 353 लावा, अगदी मी स्वतःही मध्ये आलो तरी लावा!”
यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना थेट सुनावलं. जांभुळकरांनी “धरण करताना मंदिरं जातातच की साहेब, ऐकून घ्या, पण मी माझं करतो” असं म्हटल्यावर अजितदादांचा पारा चढला. त्यांनी संतप्तपणे उत्तर दिलं, “आपलं वाटोळं झालंय! हिंजवडीचं IT पार्क बेंगळुरू-हैदराबादला चाललंय… तुम्हाला काही पडलं नाही?”
अधिकाऱ्यांनी कामांमधील अडथळे आणि काही स्थानिकांच्या विरोधाची माहिती दिल्यावर अजित पवार म्हणाले, “आपलं ठरवून टाका – कामामध्ये कोणी आलं, मग तो कुणीही असो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. समजून सांगा, नाही मानलं तर कारवाई करा!”
त्यांनी पुढे सांगितले की, “दरवेळी ‘माझं हे करा, ते करा’ म्हणत बसायचं नाही. आपल्याला एकत्रितपणे सगळं काम पूर्ण करायचं आहे.”
दरम्यान, हिंजवडीतील रस्ते, वाहतूक, पाणी, आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेत असताना अजित पवारांनी PMRDA व मेट्रो अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा धारेवर धरलं. काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचना योग्य रीतीने पाळल्या गेल्या नाहीत, हे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दौऱ्याचा निष्कर्ष स्पष्ट होता – हिंजवडीतील कामांमध्ये कुठलीही विलंबशक्ती अजित पवार स्वीकारणार नाहीत. “सुधारणा तातडीनं करा आणि काम पूर्ण करा!” हाच त्यांच्या दौऱ्याचा स्पष्ट संदेश होता.



