मुंबई

Sardarji 3 Movie : ‘सरदार जी 3’ चित्रपटात पाकिस्तानी कलाकार? भाजप चित्रपट कामगार आघाडीचा उद्रेक — तात्काळ ब्लॅकआउटची मागणी!

•पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त भावना; ‘भारतीय चित्रपटसृष्टीत शत्रू देशाच्या कलाकारांना स्थान कशासाठी?’ भाजप चित्रपट आघाडीचा सवाल

मुंबई :- भारतीय चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावरून संतापाचा भडका उडाला आहे. प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजित दोसांझच्या ‘सरदार जी 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात पाकिस्तानी कलाकार झळकणार असल्याचे उघड होताच, भाजप चित्रपट कामगार आघाडीने या चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे.

भाजपा चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, सरचिटणीस विवेक राजेंद्र जगताप,मुंबई सरचिटणीस नितीन कोदे आणि सचिव निकिता घाग यांनी संयुक्त निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे — “पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला असताना, त्या देशातील कलाकारांना भारतीय सिनेमात स्थान देणे हे राष्ट्राशी गद्दारी करण्यासारखे आहे!”

27 जून 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सरदार जी 3’ मध्ये हनिया आमिर, नासिर चिन्योती, डॅनियल खावर आणि सलीम अल्बेला या पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय जनतेमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आघाडीने सेन्सॉर बोर्डकडे साकडे घातले आहे की, “हा चित्रपट सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी लागू होणार असेल, तर जनभावना लक्षात घेऊन त्यास प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.” त्यांच्या म्हणण्यानुसार, शत्रूराष्ट्रातील कलाकारांना भारतात व्यासपीठ देणे म्हणजे हुतात्मा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे.

या विरोधाच्या लाटेत, आघाडीने सोशल मीडियावर #BanSardaarJi3 आणि #NoToPakArtists हे हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली असून, हजारो सिने कामगारांनी याला पाठिंबा दिला आहे.

समीर दीक्षित पुढे म्हणाले, “देशावर गोळ्या झाडणाऱ्यांच्या देशातील कलाकारांना आपल्या सिनेमात अभिनयाची संधी देणे, हे स्वाभिमानी भारतवासीयांना मंजूर नाही. भारतीय कलाकारांसाठी हे व्यासपीठ राखावे.”

चित्रपट सर्टिफिकेशन बोर्ड, सरकार आणि चित्रपट वितरक यांच्याकडे ‘सरदार जी 3’ च्या थिएटर रिलीजवर बंदी आणावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

जर या मागणीकडे दुर्लक्ष झाले, तर आघाडीने “संपूर्ण देशभर आंदोलन उभारण्याचा इशारा” दिला आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या प्रदर्शनावर गडद सावट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0