Pune News : शाळा दूर, बालविवाह जवळ! – राज्यातील 15 हजार किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित; शिक्षण विभागाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह

•कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाचा मुलींना मोठा फटका; शिक्षण सोडून गेलेल्या 30 हजार मुला-मुलींची नोंद शासनाकडे नाही
पुणे :- राज्यातील शिक्षण विभागाच्या संचमान्यतेचे बदललेले निकष आणि कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणावर अत्यंत गंभीर परिणाम होत असल्याचे उघड झाले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुल्कमाफी आणि प्रवास भत्त्यासारख्या योजना असूनही, यंदा राज्यात तब्बल 15 हजार 357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर राहिल्या आहेत.
राज्यात यंदा एकूण 30 हजार 714 मुले-मुली शाळाबाह्य आढळली असून, यातील जवळपास निम्मा आकडा मुलींचा आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे. विशेष म्हणजे, या आढळलेल्या मुला-मुलींपैकी किती जणांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले, याची राज्यातील अधिकृत नोंद मात्र उपलब्ध नाही.
शिक्षणापासून वंचित राहण्याची कारणे
शासनाकडून कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने अनेक गावांमध्ये घरांजवळ शाळा राहिलेल्या नाहीत. शाळा दूर असल्यास मुलींना दूरच्या शाळेत पाठवणे पालकांना सुरक्षित वाटत नाही. एका जिल्हा परिषद शिक्षकाने नमूद केल्यानुसार, गावामध्ये किंवा परिसरात छेडछाड किंवा अत्याचाराची एखादी घटना घडल्यास शाळेतील मुलींची उपस्थिती लगेच घटते. याशिवाय, राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळांचे वर्ग जोडलेले नसणे, या प्रमुख कारणांमुळे मुली शिक्षणापासून दुरावत आहेत. शाळा दूर असल्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे.



