Kurla Crime News :कुर्ला पोलिसांची ड्रग्ज तस्कराविरुद्ध मोठी कारवाई; धारावीचा सराईत गुन्हेगार जेरबंद

•मेट्रो हॉटेल परिसरात रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केला पाठलाग; 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
मुंबई :- मुंबईत वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. याच मोहिमेअंतर्गत कुर्ला पोलिसांनी मेट्रो हॉटेल परिसरात सापळा रचून सलमान खान (29 वय) नावाच्या एका तस्कराला अटक केली आहे. आरोपी हा धारावीचा रहिवासी असून त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री कुर्ला पोलीस ठाण्याचे पथक मेट्रो हॉटेल परिसरात गस्त घालत असताना, त्यांना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे.


