मुंबई

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र!

•बेस्टच्या निवडणुकीत ‘शिवसेना (ठाकरे)’ आणि ‘मनसे’च्या कामगार संघटनांची युती

मुंबई :- मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधातील यशस्वी आंदोलनानंतर आता बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या कामगार संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या पतपेढीची निवडणूक येत्या 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे, कारण या निवडणुकीतील विजय कामगार संघटनेचे उपक्रमातील बळ वाढवतो. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे) प्रणित बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत चर्चा सुरू होती.

सुहास सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापासून बेस्टमधील प्रत्येक लढाई शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्रितपणे लढणार आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे बंधू एकत्र येतील का, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधातील मेळाव्यात ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी,’ असे विधान केले होते.

तसेच, राज ठाकरे यांनीही अलीकडेच पदाधिकाऱ्यांना ‘आम्ही दोन भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलो, आता तुम्हीही आपसातील वाद आणि मतभेद सोडून द्या,’ असा सल्ला दिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. बेस्टमधील अनेक कामगार दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे ही युती दोन्ही संघटनांसाठी लाभदायक ठरू शकते असे मानले जाते. या निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0