ठाणेमुंबई
Trending

Satej Patil : महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सतेज पाटलांचा ‘व्हिडीओ बॉम्ब’; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ

Satej Patil Shared Video : सत्ताधारी आमदाराने 40 लाख घेतल्याचा दावा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत खुलाशाची मागणी

कोल्हापूर l मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असतानाच, आमदार सतेज पाटील यांनी एक खळबळजनक व्हिडीओ जारी करून राजकीय वर्तुळात मोठा स्फोट केला आहे. एका तरुण कंत्राटदाराकडून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. सतेज पाटील यांनी हा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महायुतीची कोंडी झाली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “Is it true?” असे कॅप्शन देऊन सरकारला जाब विचारला आहे. या प्रकरणावर बोलताना पाटील म्हणाले की, “कोल्हापुरात सत्तेत असणाऱ्या एका आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जेव्हा लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप होतात, तेव्हा त्याची सत्यता लोकांसमोर येणे गरजेचे असते. जर जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असेल, तर त्याचा खुलासा मतदानापूर्वीच झाला पाहिजे.” हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने व्हायरल केला आहे, त्याला बोलावून सायबर सेलने तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार आहेत. सतेज पाटील यांनी थेट नाव न घेता हे आमदार शिंदे गटाचे असल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगितले. “या जिल्ह्यातील त्या पक्षाच्या तिन्ही आमदारांनी आता समोर येऊन खुलासा करण्याची वेळ आली आहे. मतदारांना कळले पाहिजे की ते कोणाला आणि कशासाठी मतदान करत आहेत,” असे म्हणत पाटील यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केली.

केवळ भ्रष्टाचारच नव्हे, तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरूनही सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करत पाटील म्हणाले की, “सध्या भाजपच्या पाठबळामुळे केवळ एकाच बिझनेस हाऊसला फायदा पोहोचवला जात आहे. पूर्वी सर्व उद्योजकांना समान संधी मिळत असे, मात्र आता संपूर्ण महाराष्ट्र एकाच उद्योगपतीला आंदण देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. महाराष्ट्र गहाण ठेवण्याचे हे काम आम्ही होऊ देणार नाही.” प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आलेल्या या ‘व्हिडीओ बॉम्ब’मुळे आता मतदानावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0