
Mumbai Diwali Festival News : फराळ, कंदिल आणि तोरणांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी; वाहतूक कोंडीत मोठी वाढ
मुंबई :- येत्या शुक्रवारपासून वसुबारसने दिवाळी सणाची सुरुवात होणार असल्यामुळे मुंबईतील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर आणि बोरिवलीसारख्या मध्यवर्ती बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले आहे. फराळ, कपडे, तोरणं, दिवे, पणत्या आणि रांगोळीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवार आणि रविवारपासूनच ग्राहकांनी सर्वत्र मोठी गर्दी केली आहे. Mumbai Diwali News
गर्दीचा उच्चांक आणि वाहतूक कोंडी
यंदा ऑनलाईन खरेदीचा काळ असला तरी, पारंपरिक वस्तूंसाठी दादर, क्रॉफर्ड मार्केट येथे ग्राहकांची झुंबड उडाली आहे. संध्याकाळच्या वेळेत या बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला जातो.
- दादर मार्केट मध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे रस्त्यावर दुकानं थाटली गेली आहेत. रस्त्यांवर कंदिल आणि फटाक्यांमुळे सजावट झाली आहे.
- खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. प्रभादेवीचा पूल पाडल्यामुळे आधीच दादरमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे, त्यातच आता खरेदीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
- प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास टॅक्सीचालकही तयार नसल्याचे चित्र मुंबईत अनुभवायला मिळत आहे.
यंदा बाजारपेठांतील विशेष आकर्षण
दिवाळीच्या वस्तूंच्या खरेदीत यंदा अनेक नवीन गोष्टी बाजारात आल्या आहेत. - कंदिल: यंदा पैठणीचे कंदिल आणि मराठी भाषेचा अभिमान सांगणारे विशेष कंदिल ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
- रांगोळी: वेळ वाचवणारे व सहज काढता येतील असे स्टेन्सिल, रंग भरण्याची सोय असलेल्या तयार रांगोळ्या, तसेच रांगोळी काढल्यासारखे दिसणारे स्टीकर उपलब्ध आहेत.
- पणत्या: मातीच्या पारंपरिक पणत्यांबरोबरच चिनीमातीच्या पणत्या मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
आता पुढचे काही दिवस दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व लहानमोठ्या बाजारपेठांमध्ये अशीच झुंबड उडणार आहे.


