मुंबईठाणे
Trending

Chatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा! उमेदवारी नाकारल्याने संतप्त महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chatrapati Sambhaji Nagar Latest News : ‘नेत्यांच्या बायका एसीत, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मरायचे का?’; दिव्या मराठेंचा नेत्यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. पक्षासाठी 18 वर्षे रक्ताचे पाणी करणाऱ्या आणि 15 गुन्हे अंगावर घेणाऱ्या माजी नगरसेविका दिव्या मराठे यांनी उमेदवारी नाकारल्याच्या रागातून भाजप कार्यालयाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

नेत्यांच्या केबिनचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या निवडणूक कार्यालयात माजी मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड हे एबी फॉर्मचे वाटप करत असताना इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. प्रभाग 20 मधून उमेदवारीची अपेक्षा असलेल्या दिव्या मराठे यांचे नाव डावलले गेल्याचे समजताच त्यांच्यासह संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

भररस्त्यात अंगावर ओतून घेतले पेट्रोल

उमेदवारी न मिळाल्याने हताश झालेल्या दिव्या मराठे यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्या स्वतःला पेटवून घेणार इतक्यात तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना झडप घालून रोखले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठली आहे.

‘मी 15 केसेस अंगावर घेतल्या, पक्षाने काय दिले?’

आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिव्या मराठे यांनी आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मी गेल्या 18 वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. पक्षासाठी मी 15 केसेस अंगावर घेतल्या. जेव्हा मुले लहान होती, तेव्हा घरादाराचा विचार न करता रस्त्यावर उतरले. आज पक्ष पहिल्या क्रमांकावर आल्यावर आम्हा निष्ठावंतांना डावलून नव्यांना संधी दिली जात आहे. नेत्यांच्या बायका एसीत बसतात आणि आम्ही फक्त संघर्ष करायचा का?”

निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी

केवळ दिव्या मराठेच नव्हे, तर भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी तर निवडणूक लढवण्यासाठी आपल्या नोकऱ्याही सोडल्या होत्या, मात्र ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलल्याने त्यांच्यावर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. सर्व्हेमध्ये नाव असूनही तिकीट कापल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांना धारेवर धरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0