मुंबई

Pratap Sarnaik : “मी मंत्री नंतर, आधी मराठी!” — प्रताप सरनाईकांचा पोलिस कारवाईवर संताप

•मराठी मोर्चाला नाकार, तर व्यापाऱ्यांना मोकळं मैदान… पोलिसांचा पक्षपाती अजेंडा?”

मुंबई | मिरा रोडमध्ये मराठी स्वाभिमान मोर्च्याला परवानगी नाकारून, मध्यरात्री मनसे नेत्यांवर करण्यात आलेल्या अटकसत्रावरुन राज्यात राजकीय तापमान चढले असून, याचे पडसाद थेट महायुतीच्या आतमध्येही उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “मी मंत्री नंतर आहे, आधी मराठी आहे,” असा भावनिक उद्गार काढला.

सरनाईक म्हणाले, “मराठी बांधव मोर्चा काढत असतील तर त्यांना परवानगी मिळाली पाहिजे. ती नाकारली गेली, तर कायदेशीर पद्धतीने कारवाई करा, पण रात्री अपरात्री अटक करणे योग्य नाही. ही पोलिसांची कार्यपद्धती निंदनीय आहे.”

“महायुती सरकारने पोलिसांना अशी अटक करण्याचे आदेश दिलेले नाहीत. गृहखात्यानेही अशा कारवाईसाठी सूचनाच दिलेल्या नाहीत,” असे सांगत त्यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला. पोलिस कुणाच्या सांगण्यावरून हे करत आहेत, याचे उत्तर मिळायलाच हवे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

एकीकडे व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्याची मोकळीक, आणि दुसरीकडे मराठी जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष… हा भेदभाव आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, “पोलिस कुठल्यातरी पक्षाचा अजेंडा राबवत आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो आहे.”

सरनाईकांनी आजच पोलिस आयुक्तांशी संवाद साधून नाराजी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

“मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला तेव्हा परवानगी नव्हती, तरी तो निघाला. मग मराठी लोकांचा मोर्चा का थांबवला जातो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0