Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : २.३८ कोटींचा अंमली पदार्थ जप्त

ठाणे, दि. 29 ऑगस्ट : ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सिम्बॉयोसिस शाळेसमोर, मुंब्रा येथून सापळा कारवाई करून २.३८ कोटींहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत राजस्थानमधील एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीचे नाव सुमित राजुराम कुमावत (रा. बोरिवली, मूळ रा. जैसलमेर, राजस्थान) असे असून, त्याच्याकडून २ किलो ३७४ ग्रॅम ‘हायब्रीड गांजा (विड्स)’ (किंमत रु. २,३७,४०,०००/-) तसेच १९ MDMA/ECSTASY टॅबलेट्स (किंमत रु. १,४७,०००/-) असा एकूण रु. २,३८,८७,९५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४०८/२०२५, NDPS Act १९८५ कलम ८(क), २०(ब)(ii), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. तपास पोउपनि राजेंद्र निकम हे करीत आहेत.
पोलिस तपासात उघड झाले आहे की हायब्रीड गांजा व MDMA सारखे अंमली पदार्थ विदेशातून तस्करीद्वारे भारतात आणले जातात. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मरके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक, हवालदार व इतर पोलिसांच्या पथकाने केली.
पोलिसांचे आवाहन :
अंमली पदार्थांचे साठवणूक, वाहतूक किंवा विक्री हा गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील.


